सर्वसाधारणतः बॅचलर लाईफ म्हणजे मौजमजा, आशा-निराशा, अपेक्षा, अपेक्षाभंग, स्वप्नं, ध्येय, यशापयश, उदासिनता, प्रेम, असफल प्रयत्न तसेच या सगळया गोष्टींमधून आयुष्यात पुढे पुढे जात राहणे, या सगळ्यातून हळूहळू आयुष्य स्थिरस्थावर करणे, परिपक्व होत जाणे. हेच या काल्पनिक कादंबरीमधून दर्शविण्यात आले आहे.
या काल्पनिक कथेची मांडणी मात्र वास्तवात, प्रत्यक्षात असलेल्या प्रथितयश आय. आय. टी. (मुंबई) (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, मुंबई) या ठिकाणावर आधारली आहे. या संस्थेत प्रवेश मिळणे म्हणजे अतिशय कठीण पण ते शक्य झाल्यास स्वप्नपूर्ती झाल्यात जमा म्हणावी, उज्वल भविष्याची खात्री ! अशी ही संस्था म्हणजे 'होतकरू, प्रचंड बुद्धिमान, अतिशय विद्वान' मानले गेलेल्या इंजीनियरिंग शिकणार्या विद्यार्थी - विद्यार्थिनी यांची जणू स्वतःची नगरी... इथे कमी पॉईंट मिळवणारे म्हणजे जणू 'ढ'....
अर्थात, सगळया नियमाला अपवाद असतो तसा इथेही.... इथे प्रवेश मिळवणारे सगळेचजण काही सर्वमान्य असलेल्या 'बुद्धिमान' किंवा' अतिशय विद्वान' असल्याच्या परिमाणांमधे बसत नाहीत. त्यांची बुद्धिमत्ता समाजाच्या ठरलेल्या साच्यात बसवता येत नाही, बसत नाही. त्यामुळे अशा साच्यात बसवू पाहणार्या, यशापयश एकाच मोजपट्टीने मोजू पाहणार्या मानसिकतेसोबत या विद्यार्थ्यांना लढा देत राहावे लागते. कधीकधी आयुष्यभरही .... पण म्हणून काही अशा सगळ्यांचीच बुद्धिमत्ता निष्फळ ठरत नाही, वाया जात नाही. ते या सगळ्यातून कल्पकतेने मार्ग काढतात. तरीही, काही जण मात्र निराशेने जे मिळेल ते करत राहतात, भले ते त्यांच्या क्षमतेपेक्षा कमी असले तरी किंवा निराशेच्या गर्तेत आयुष्य संपवून घेतात. तसेच काही विद्यार्थी मात्र आपली ध्येय सुरवातीपासूनच ठरवून त्या दिशेनेच पावले टाकीत पूर्तता करून स्थिरस्थावर होतात. हीच त्यांची यशाची व्याख्या असते.
ही कादंबरी इंजीनियरिंगचे विद्यार्थी, विशेषतः भारतीय, यांच्या आयुष्याच्या याच वास्तवाचे चित्रण करते.
आय. आय. टी. चे वेगवेगळ्या परिस्थितीतून आलेले तीन विद्यार्थी - हरी, रायन आणि आलोक - यांच्या आयुष्यात तिथे घडलेली कहाणी, म्हणजे ही काल्पनिक कादंबरी. या तिन्ही मित्रांचे प्रवेश, सीनियर विद्यार्थ्यांकडून होणारे रॅगिंग, अभ्यास, स्वप्नं, प्रोजेक्ट्स, मैत्री, प्रेम, कुटुंबासह असलेले नातेसंबंध, या सगळया गोष्टी एकत्र बांधल्या गेल्या आहेत. हरीचे त्याच्या अतिशय कडक शिस्तीच्या प्रोफेसरांची मुलगी नेहा वर जडलेले प्रेम या भोवती हळूहळू अख्खी कादंबरी फिरत राहते,जणू तोच कथेचा मूळ गाभा ठरतो. पदवीधर होण्यापर्यंत मधली वर्षे कशी जातात, यावरून कथा पुढे पुढे सरकत जाते, कधीकधी थेट तर कधीकधी द्वितीय किंवा तृतीयवचनी पद्धतीने आणि कादंबरी शेवटापर्यंत येऊ लागते. अर्थात हा शेवट 'शेवट' नसून तिन्ही मित्रांच्या आयुष्याची खरी सुरवात असणार आहे. या तिन्ही मित्रांना फक्त पाच पॉईंट्सची गरज असते, जी त्यांचे भविष्य उज्ज्वल ठरू देईल की काळवंडून टाकेल हे कादंबरी वाचूनच कळेल. मात्र, आयत्या वेळी, त्यांचे हे शिस्तप्रिय, अतिशय कठोर वागणारे, खुन्नस धरणारे प्रोफेसर त्यांना मार्ग दाखवतात. त्यांच्या या वागणुकीत अचानक झालेला बदल नक्की कसा आणि का झाला हे कादंबरी वाचून वाचकांनी जाणून घेणे अधिक रंजक ठरेल.
लेखक चेतन भगत लिखित 'फाईव्ह पॉईंट समवन' ही कादंबरी रूपा पब्लिकेशन ने सन २००४ मधे प्रकाशित केली. पुढे सुप्रसिद्ध झालेला हिंदी बॉलीवुड चित्रपट 'थ्री इडियट्स' याच कादंबरीवर आधारित होता. अर्थात, मूळ कथेतील हरी या पात्रापेक्षा रायन या पात्राभोवती चित्रपटाची कथा फिरते.
माझ्या कुटुंबात सर्व इंजीनियरिंग शिकणार्या बहीणभावंडांमध्ये मी एकटीच कला शाखेची विद्यार्थिनी. त्यामुळे काही तांत्रिक बाबी जसे प्रोजेक्ट्स, पॉईंट्स, अशा बाबी समजून घ्यायला कठीण गेलेले सुरुवातीला पण ही कादंबरी सर्वसाधारण वाचकांच्या मनात उत्सुकता निर्माण करते, त्यामुळे या गोष्टी गौण ठरतात, वाचताना फार अडथळे येत नाहीत.
कॉलेज लाईफ, पुन्हा एकदा तारुण्य अनुभवायचे असेल, आठवणींच्या खजिन्याला हात लावायचा असेल तर नक्की वाचा, 'फाईव्ह पॉईंट समवन' !
माझे स्टार रेटिंग ३-स्टार ⭐⭐⭐
No comments:
Post a Comment